कोणीच कोणाला तुच्छ समजू नये
आज परिस्थिती वेगळीच आहे. या परिस्थितीची वास्तविकता पाहता असं जाणवतं की या परिस्थितीत काही लोकं स्वतःला फार मोठे महात्मा समजतात आणि दुस-याला तुच्छ समजतात. लोकांच्या तोंडून नेहमी शब्द बाहेर पडत असतात की किती घाणेरडा आहेत हे लोक. किती तुच्छ आहेत हे लोक. परंतू तसे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण आपली विचारशक्तीच मुळात तुच्छ आहे. म्हणून आपल्याला तसं दिसणारंच यात तसूभरही असत्यता नाही.*
देशात विविध प्रकारचे लोक राहतात. त्यात गरीब श्रीमंतही असतात. कोणी उच्च जातीत जन्माला येतात. कोणी कनिष्ठ जातीत. कोणी शेतकरी बनतात. कोणी व्यापारी तर कोणी सरकारी नोकरदार. या घडून येणा-या गोष्टी प्रारब्धानं घडून येतात. या दृष्टिकोनातून अशी एक म्हण आहे की सगळेच कुत्रे काही काशीला जात नाही. काही गावातही राहतात. हे शंभर प्रतिशत सत्य आहे. कारण सर्वच लोकं काही पंतप्रधान बनत नाहीत. काही सामान्य शेतकरीही बनत असतात.
आपापलं प्रारब्ध. कोणी कोणी प्रारब्ध मानत नाहीत. ते म्हणतात की कार्य केल्यास फळ मिळतं. परंतू फळ मिळविण्यासाठी आधी कार्य हवे की नाही. त्यांचही बरोबरच. परंतू याबाबत एक मत मांडतो, ते म्हणजे कार्य तर शेतकरी आणि शेतमजूरही करतात. अपार मेहनत करतात ते. तरीही त्यांना सुख असतं का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. त्यांची मुलंही अपार मेहनत करीत करीत आपलं आयुष्य काढत असतात. याला काय म्हणावे? कधीकधी एखाद्या वेळेसच चमत्कार होतो आणि त्यांना नोकरी लागते व त्यांचा कायापालट होतो. याउलट ज्याचा जन्म अति श्रीमंत कुटूंबात होतो, त्याला अमाप सुख मिळतं जन्मापासूनच. त्यांना जीवन जगतांना कोणताच त्रास होत नाही. ते सुखी असतात संपुर्ण आयुष्यभर. याला काय म्हणावे? यालाच प्रारब्ध नाव देता येईल. आज तेच प्रारब्ध. त्याच प्रारब्धानुसार माणसाचे सुख दुःख ठरलेले आहे असे दिसते.
आयुष्यात आपापल्या प्रारब्धानुसार कोणत्याही गोष्टीचे तीन स्तर पडतात. उच्चस्तर, मध्यम मध्यमस्तर आणि कनिष्ठ स्तर. मध्यम स्तराबाबत काही भानगड नाही. तो स्तर दोघाही स्तराला जोडतो. तरीही याबाबतीत सांगायचं झाल्यास आज उच्चस्तर आणि कनिष्ठ स्तर यात फार मोठी दरी आपल्याला जाणवते. ती दरी कोणती? तर ती दरी आहे विषमतावादाची. त्यालाच भेदभाव असं म्हणता येईल. आता या स्तराचा संबंध समाजाशी जोडू.
समाजातही उच्च, मध्यम व कनिष्ठ वर्ग असतात. यात उच्च वर्ग हा कनिष्ठ वर्गाला हिन लेखतो. त्यांना तुच्छ समजतो. त्यांच्याशी व्यवहार करणं टाळतो. त्यांच्याकडे अतिशय तुच्छ नजरेनं पाहतो. परंतू याचा विचार करीत नाही की आपणही आईच्या गर्भात नऊच महिने अधिवास केला. कोणीही आईचा लाल बारा महिने राहिलेला नाही. मग जो आईच्या गर्भात बारा महिने राहिलेला नाही, मग तो उच्च कसा? तसंच प्रत्येकाचं शरीर हाड, मांस रक्ताचं बनलेलं असतांना एक उच्च आणि दुसरा कनिष्ठ कसा? फरक एवढाच आहे की त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचा जन्मच मुळात कनिष्ठ व उच्च जातीत झाला. मग त्यात आपल्याला उच्च कनिष्ठ मानण्याचा अधिकार कोणी दिला? याचं उत्तर आपल्याजवळ नसेलच. उदा. द्यायचं झाल्यास एखादा व्यक्ती मुख्यमंत्र्याच्या घरात जन्माला येतो. तो भावी काळात मुख्यमंत्री वा आमदार खासदार बनला तर त्यात कोणतं तीर मारणं झालं? हं, एखाद्या गरीब शेतक-यांचा मुलगा जर आमदार, खासदार बनला वा मुख्यमंत्रीपद त्याला मिळालं, तर त्याला विशेष महत्त्व देतात येईल.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज कलियुग आहे. या काळात कोणीच मोठा नसला आणि कोणीच लहान नसला व प्रत्येकजण आईच्या गर्भात नवच महिने राहिला असला वा प्रत्येकाला हाड, मांस व रक्त समान असलं तसेच कोणीच व्यक्ती सोन्या, चांदीचा बनलेला नसला तरी काही लोकं स्वतःला फार मोठे समजतात. त्यांचा जन्म त्यांच्या प्रारब्धानुसार उच्च जातीत वा उच्च घराण्यात झाल्यामुळेच ते गरीब वा कनिष्ठ जातीला तुच्छ समजून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करीत असतात आणि बिचारे तेही आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार निमुटपणे सहनच करीत असतात.
आजपर्यंत आपण पाहिलंच आहे की पुर्वी समाजात असाच कनिष्ठ आणि तुच्छ समजून अन्याय, अत्याचार झाला. कित्येक अस्पृश्यांना मारलं गेलं याच तुच्छ समजण्यातून. कित्येक महिलांच्या जिंदग्या बरबाद केल्या गेल्या याच तुच्छतेच्या भावनेतून. खरंच ही तुच्छतेची दरी मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब लढले. त्यांनी संविधानात कलमांचाही समावेश केला. परंतू खरंच समाजातील हा तुच्छपणा मिटला का? याचं उत्तर नाही असंच आहे.
विशेष सांगायचं म्हणजे तिही माणसंच आहेत, गरीब असली तरी. त्यांनाही भावभावना आहेत, ते मुकाट्यानं ऐकून घेत असतील तरी आणि त्यांनाही इतरांसारखं सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे. हं, ठीक आहे की आपला जन्मच आपल्या प्रारब्धानुसार श्रीमंत घरी झाला. परंतू याचा अर्थ असा नाही की आपण कोणाला तुच्छ समजावं. त्यांच्याशी हिनतेचा व्यवहार करावा. त्यांना काहीबाही बोलावं.
आपण हे लक्षात ठेवावे की या सर्व गोष्टींचा हिशोब होत असतो. जो असा व्यवहार करतो, तो कधीच पुढं जात नाही. कधी प्रारब्धानुसार असं घडतं की तो पटकन खाली येतो. त्याची अधोगती होते व त्यानंतर विचार करायला वेळच मिळत नाही. आज म्हणून कोणी कोणालाच तुच्छ समजू नये. आज आपण पाहिलेलं आहे की बरेचसे राजे राजाचे रंक बनलेले आहेत. कालचे राजे असलेले काही आदिवासी आज रस्त्यारस्त्यावर भीक मागतांना दिसत आहेत. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास कौरव पांडवांचं देता येईल. प्रचंड शक्तीसामर्थ असलेले कौरव आपल्या अशाच हेकेखोर व हिन विचारशक्तीनं अठरा दिवसाच्या युद्धामध्ये पुर्णतः समाप्त झाले. पर्यायानं सांगायचं झाल्यास आपला हेकेखोरपणा वा आपली हिन विचारशक्ती जास्त दिवस टिकत नाही. तिचा अंत होतो. दिवसानंतर रात्र येणारच व रात्रीनंतर दिवस. तसंच पोर्णीमेनंतर अमावस्या व अमावस्येनंतर पोर्णीमा. कारण तो निसर्ग नियम आहे. म्हणूनच कोणी कोणाला तुच्छ समजू नये म्हणजे मिळवलं. विशेष सांगायचं म्हणजे लोकं तुच्छ नाहीत. जरी ते गरीब असले तरी वा त्यांचा जन्म कनिष्ठ जातीत झाला असला तरी. आपणच तुच्छ आहोत. कारण आपली विचार करण्याची पात्रताच तुच्छ आहे. आपण आधी ती पात्रता बदलवावी. मगच लोकांना आपण तुच्छ समजावे. अन्यथा आपल्याला इतर कोणाला तुच्छ समजण्याचा अधिकार नाही.